Saturday, July 25, 2009

'आम आदमी'ची कैफियत राष्ट्रपती भवनापर्यंत...

http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4818180.cms

म. टा. विशेष प्रतिनिधी। नवी दिल्ली Saturday, July 25, 2009

तुमची एखादी महत्त्वाची फाइल पास करण्यासाठी सरकारी अधिकारी त्यावर वजन ठेवायला सांगतोय? तुमच्या गल्लीतल्या गुंडाला 'खाकी' संरक्षण मिळतेय? तुमच्या स्वयंसेवी संस्थेला सरकारी मदत हवी आहे? तर मग थेट संपर्क साधा राष्ट्रपती भवनाशी. तुमच्या तक्रारी-सूचनांची योग्य दखल घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येईल, याची खात्री बाळगा...

देशातील आम आदमीचे कनेक्शन थेट राष्ट्रपती भवनाशी जोडण्याची किमया साधणार आहे ते helpline.rb.nic.in नामक पोर्टल. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शुक्रवारी त्याचा शुभारंभ केला. सरकारी अथवा बिगर सरकारी यंत्रणेद्वारे होणारी सर्वसामान्यांची छळवणूक वा अन्य स्वरूपाच्या व्यथा, वेदना, तक्रारींची दखल त्यातून राष्ट्रपती भवन घेईल.

राष्ट्रपती भवनात विविध प्रकारच्या तक्रारींची रोज सरासरी ७५० पत्रे येतात. यातली निम्म्याहून अधिक पत्रे टपालातून येतात. तर, इतर तक्रारी ई-मेल, फॅक्स आणि कुरिअरसारख्या माध्यमातून येतात. त्यातील बहुतांश तक्रारी पोलिसांचे अत्याचार, सार्वजनिक सोयींची हेळसांड, सरकारी अथवा बिगर सरकारी यंत्रणांद्वारे होणारा छळ, सरकारी मदत व खासगी समस्यांशी संबंधित असतात. राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या आपल्या तक्रारीचे पुढे नेमके काय झाले, याची अद्ययावत माहिती आतापर्यंत तक्रारदाराला कळत नसे. मात्र आता हेल्पलाइन पोर्टलवर आपण पाठवलेल्या तक्रारीची ताजी स्थिती काय, हे कळू शकेल. ई-याचिका दाखल करणे, पुराव्याचे दस्तावेज स्कॅन करून पाठवणे, ई-मेलद्वारे तक्रार मिळाल्याची पोहोचपावती मिळणे आदी अनेक वैशिष्ट्ये या पोर्टलमधे आहेत.

रोज मिळणाऱ्या तक्रारींची छाननी राष्ट्रपती भवनातील हेल्पलाईन डेस्कतफेर् यापुढे केली जाईल. छाननीत प्रामाणिक व योग्य वाटणाऱ्या तक्रारी संबंधित विभाग व मंत्रालयांकडे पाठवण्यात येतील. मंत्रालय केंद सरकारचे असो अथवा राज्य सरकारशी संबंधित, राष्ट्रपतींकडून येणाऱ्या तक्रारींकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही, हा या पोर्टलचा विशेष आहे.

No comments:

Post a Comment